पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दीर्घकाळापासून या हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बिहार निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला हा हप्ता आता येत्या १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
हप्ता का रखडला?
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१ व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र, बिहार विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने केंद्र सरकारने हा हप्ता जाहीर करण्यात विलंब केला. आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर पीएम किसान प्रशासनाने अधिकृतरित्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
अधिकृत घोषणा
पीएम किसानच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून माहिती देण्यात आली की देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता थेट जमा होईल. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून रब्बी हंगामाच्या तयारीतही मदत होणार आहे.
